जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. यल्लमा देवी यात्रेस कालपासून मोठया उत्साहात सुरुवात झाली असून आज यात्रेतील पहिला दिवस गंधोटगीचा होता. यल्लू आईचा उदो उदोच्या जयघोषात लाखो भाविकांनी देवीचा गंध नेसून दर्शन घेतले. नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री.यल्लमादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेस आज गुरूवारपासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून आज अनेक भाविक भक्तांनी देवीचा नवस फेडला.
आज सोमवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी देवीची अभिषेक पूजा करून देवीची खणानारळाने ओटी भरली. त्यांनंतर विधिवत पूजा व आरती करण्यात आली. आपल्या शरिराच्या व्याधी व रोग दूर व्हावेत,आपल्यावर देवीची कायम कृपा रहावी यासाठी ज्या भाविक भक्तांनी देवीला नवस बोलले होते व देवीकडे साकडे घातलेले होते ते लोक आपला नवस फेडण्यासाठी आज आले होते.
भाविकभक्तांना चांगल्या प्रकारे देवीचे दर्शन घेता यावे या करिता यात्राकमिटीच्या वतीने नव्यानेच दर्शन मंडपची उभारणी केली आहे. मंदिर परिसरात बॅरेकेटींग लावून दर्शनाची चांगली सोय केल्याने भाविकभक्तांना चांगल्या प्रकारे देवीचे दर्शन घेता येत आहे. अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी यात्राकरूंसाठी फिरते शौचालप, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे यात्रा चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी आर.आर.काॅलेज जत चे एन.सी.सी.विद्यार्थी, पंढरपूर येथील ५० तरूणांची खासगी सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे.
यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्त मागविला आहे. यात्रेतील हुल्लडबाजासाठी गुंडा पथक व चोरट्याच्या बंदोबस्तसाठी साध्या वैशातील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यात्रेत खेळणी, आकाशी पाळणे यासह विविध प्रकारची मनोरंजनाची साधने आली आहेत.
सालाबादप्रमाणे यात्रा मोठ्याप्रमाणात भरविण्यात आली असून यात्रेत पंढरपूर येथील मेवामिठाई चे व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह विविध व्यवसायाचे हजारो स्टाॅल लागले आहेत. सुप्रसिद्ध तमासगीर मंगला बनसोडे यांचा तमाशाही यात्रेत आला आहे.
जतचे गोपीचंद पडळकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही यात्रेत जत बिळूर रस्त्याला लागून भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालू केले आहे.
सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यामार्फत यात्रेत कृषीप्रदर्शन भरविण्यात आले असून जतचे प्रांतधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून या कृषी प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कदम, जतचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, जत बाजार समिती सभापती शकुंतला बिराजदार, सांगली बाजार समिती सचिव महेश चव्हाण, सहसचिव केंगार, बाजार समिती संचालक रमेश पाटील, बाबासाहेब माळी, बिराप्पा शिंदे आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूनी घेण्याचे आवाहन सांगली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे सभापती
सुजय शिंदे यांनी केले आहे. त्याच प्रमाणे जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्यावतीने जनावरांचा मोठा बाजार भरविण्यात आला आहे. जतची ही यात्रा खिलार जातीच्या जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून बाजार समीतीच्यावतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या जनावरांच्या बाजारात मोठ्याप्रमाणात जनावरे विक्रीसाठी आल्याने यात्रेत जनावरे बाजार खरेदी विक्रतून कोट्यावधी रूपायांची उलाढाल होत आहे.
मंगळवारी दि. १६ रोजी श्री.यल्लमादेवीच्या यात्रेचा महानैवैध्य चा दिवस असून जत संस्थानच्या वतीने श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यातून वाजत गाजत दुपारी बारावाजता नैवेद्य आणून देवीला दाखविला जातो.
यावेळी प्रथमच यात्रेच्या इतिहासात नवीन घडामोडी घडल्या असून यात्रेच्या जागेवरून वर्षानुवर्षे ज्या जागेवर यात्रा भरविली जात होती त्या जागेचे खासगी मालक व श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत यांच्यात यात्रेच्या जागेवरून वाद वाढत गेल्याने ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी यात्रेसाठीची खासगी जागा सोडून दिली असून या जागेच्या सर्वेनंबर ला लागून मोठी पूर्व पश्चिम चालीची अशी गंधर्व ओढ्यापर्यंत सात फूट उंचीची भिंतीचे बांधकाम करून घेतले आहे.
प्रतिष्ठानच्या या निर्णयामुळे भाविकभक्त नाराज झाले आहेत. अशाने या पुढील काळात ही महाराष्ट्रातील मोठी यात्रा मोडकळीस येण्यास फार काळ लागणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे. प्रतिष्ठानने यावेळी कमी जागेत योग्य असे नियोजन केले आहे. या परिसरात पंढरपूर येथील सुप्रसिद्ध मेवामिठाई व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह सर्वच प्रकारचे स्टॉल आले आहेत.




