yuva MAharashtra जतच्या नावाला बट्टा लावण्याचा कुटील डाव | देवावरील नव्हे तर देवाभाऊवरील भक्तीसाठी जत तालुक्याचे नाव बदलण्याचा घाट; शिवसेना विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे

जतच्या नावाला बट्टा लावण्याचा कुटील डाव | देवावरील नव्हे तर देवाभाऊवरील भक्तीसाठी जत तालुक्याचे नाव बदलण्याचा घाट; शिवसेना विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    वैभवशाली जतचे हजारो वर्षापासून चालत आलेले नाव व ओळख पुसण्याचा कुटिल डाव आमदार गोपीचंद पडळकर यांनी रचला आहे. देवावरील भक्ती नव्हे तर देवाभाऊवरील भक्तीसाठी जत तालुक्याचे नाव बदलण्याचा घाट घातला असून जतची ओळख पुसण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी दिला आहे.
     महाराष्ट्रसह कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यास खूप मोठी परंपरा व फार मोठा इतिहास आहे. महाभारत रामायण काळापासून या तालुक्याची ओळख आहे. येथे आढळणारे अनेक प्राचीन शिलालेख मंदिरे ऐतिहासिक दस्तऐवज जतच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देतात. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदिलशाही सेनापती बहलोल खान यांच्यातील ऐतिहासिक युद्ध जतच्या भूमीवरच घडले. श्री दानम्मा देवी, श्री सोमेश्वर, श्री गुरु बसवेश्वर स्वामी, श्री संत बागडे बाबा, श्री संत भाऊसाहेब महाराज यांच्यासारख्या अनेक देवता व संतांची ही जन्मभूमी आहे.
     माजी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचे हे जन्मगाव आहे. जत तालुक्याच्या नावावरून त्यांचे आडनाव जत्ती असे पडले होते तेच नाव त्यांनी आपल्या जन्मभूमीचा अभिमान म्हणून कायम ठेवले आहे. वास्तविक आमदार गोपीचंद पडळकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी दोन्हीही जत नाही. ते बाहेरून लादले गेलेले आमदार आहेत. त्यांची जन्मभूमी असलेल्या आटपाडीचे नाव देवभूमी करावे स्वतःची जन्मभूमी व कर्मभूमी सोडून जतच्या नावाला बट्टा लावण्याचा कुटील डाव करू नये. 
     जत ही साधुसंत व देवी देवतांची तसेच अनेक पराक्रमी पुरुषांची जन्मभूमी आहे. ही वस्तुस्थिती आहे. याबाबतचा इतिहास जतच्या एका जेष्ठ पत्रकाराने वैभवशाली जत या ग्रंथामधून अनेक वर्षांपूर्वी मांडलेला आहे. सुमारे ३० वर्षे त्यांनी तालुक्याच्या इतिहासावर संशोधन करून हा ग्रंथ लिहिला आहे. याच ग्रंथातील माहिती चोरून देवभूमी जत या नावाने पुस्तिका प्रकाशित करून आमदार गोपीचंद पडळकर स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. पडळकर यांचे देवभूमी जत हे पुस्तक म्हणजे आयत्या पिठावरील रेघोट्या आहेत. आ. पडळकर हे देवी देवतावरील श्रद्धा व भक्तीचा डांगोरा पिटत आहेत. मात्र त्यांची देवी देवतावरील भक्ती हे केवळ डोंग आहे. जत ही आमची ओळख आहे. जत आमचा श्वास आहे. जत आमची जन्मभूमी आहे. या जन्मभूमीचे नाव कोणीतरी बाहेरचा व्यक्ती येऊन बदलत असेल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे.