जतवार्ता न्यूज नेटवर्क;
लोकशाही संरक्षणासाठी आणि मतदारांच्या सन्मानासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आले. शहरातील मार्केट यार्ड जत येथून मशालींच्या प्रकाशात, “मतदान चोर, खुर्ची सोड”, “लोकशाही वाचवा”, “घोटाळेबाजांचा निषेध असो” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. नागरिकांच्या हातातील मशालींनी जनआंदोलनाचा संदेश शहरभर पसरवला.
हा कार्यक्रम सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "लोकशाहीची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मतचोरी ही देशद्रोहासमान आहे, आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही." मोर्चातील मान्यवरांची उपस्थिती या ऐतिहासिक मोर्चामध्ये शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच काँग्रेसप्रेमी नागरिक सहभागी झाले.
मोर्चाचा संदेश व निष्कर्ष;
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेल्या पुराव्यांबाबत सविस्तर माहिती देणारी चित्रफित दाखवली मतदार यादीतील फेरफार व मतचोरीमुळे लोकशाहीच्या मुळावर गदा येते, निवडणुकीतील निष्पक्षता धोक्यात येते, आणि देशाच्या भविष्यातील कारभारावर अविश्वास निर्माण होतो, हे त्यांनी अधोरेखित केले. मशाल मोर्चाच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाने जनतेला सजग राहण्याचे, लोकशाही वाचविण्यासाठी संघटित होण्याचे, आणि भविष्यातील निवडणुका स्वच्छ व निष्पक्ष पार पाडण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

