जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील उमदी येथील २६ वर्षीय तरुणाचा जत शहरात अत्यंत अमानुष पद्धतीने खून झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. जत–सातारा मार्गावरील बाजार समितीच्या जनावर बाजार व डाळिंब मार्केट परिसरातील निर्जन ठिकाणी नग्न अवस्थेत, तोंड व डोके ठेचलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
मृत तरुणाचे नाव विकास मलकारी टकले (वय २६, रा. घुलेवस्ती, उमदी) असे असून, त्याची ओळख सायंकाळनंतर नातेवाईकांनी कपडे व शरीरावरील खुणांवरून पटवली. मृतदेहाची अवस्था इतकी विदारक होती की, सुरुवातीला ओळख पटणे अशक्य झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हा आपल्या आईसोबत उमदी येथे राहत होता. गुरुवारी सकाळी आईच्या गुडघ्याच्या उपचारासाठी त्यांना माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात आणले होते. उपचारानंतर आईला गावाकडे पाठवून विकास हा जत यात्रेला जात असल्याचे सांगून निघून गेला. मात्र तो रात्रीपर्यंत परतला नाही, तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला; पण काहीही माहिती मिळाली नाही.
शुक्रवारी दुपारी बाजार समिती परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी जत पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही घटनेची दखल घेत सखोल तपासाचे आदेश दिले.
नातेवाईकांनी हा खून जमिनीच्या वादातून झाल्याचा आरोप केला असून, उमदी येथील सात एकर जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून भावकीत सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली येथे पाठवण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण शाखा व जत पोलीस अशी दोन स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत.


