yuva MAharashtra जत नगरपरिषदेच्या निवडणूक निकालासाठी प्रशासन सज्ज

जत नगरपरिषदेच्या निवडणूक निकालासाठी प्रशासन सज्ज

जत वार्ता न्यूज
By -

२४ मतदान केंद्रांवरील मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित; २१ डिसेंबर रोजी मतमोजणी


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी २ डिसेंबर रोजी शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होणार असून, त्यासाठी सर्व प्रशासकीय व सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
     २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानातील ३४ मतदान केंद्रांवरील सर्व मतपेट्या जत येथील शासकीय धान्य गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. या ठिकाणी एस.आर.पी.एफ., जत पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पंचायत समिती, महसूल व जत नगरपरिषदेचे कर्मचारी २४ तास तैनात आहेत.

मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था;

     २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना ४ व १९ डिसेंबर २०२५ रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय धान्य गोदाम क्र. २ येथे मतमोजणी होणार असून, या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी स्थळी सर्वत्र बॅरिकेडिंग करण्यात आली असून, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व पत्रकारांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

तीन फेऱ्यांत मतमोजणी;

     मतमोजणीसाठी १२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणी तीन फेऱ्यांत पार पडणार आहे.

  • पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ ते ४,

  • दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक ५ ते ८,

  • तर तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक ९ ते ११ यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणूक यंत्रणा पूर्ण सज्ज;

     मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे.