जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील श्री.यल्लमादेवीची यात्रा मोठया प्रमाणात भरली आहे. यात्रेत करमणूकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यवसाईक आले आहेत. आज यात्रेतील किचाचा दिवस व पालखी नगरप्रदक्षिणा पार पडली.
बुधवारी पहाटे २ वा. २७ मिनिटांनी देवीचा अभिषेक करून पूजा केल्यानंतर खणानारळाने ओटी भरून आरती केली. विशेष म्हणजे कीचाच्या दिवशी देवीचे पुजारी हे देवींची अभिषेक पूजा व आरती ज्या वेळेत करतात त्या वेळेनंतर बारा तासांनी किचाचा कार्यक्रम होतो हे आजही होत आहे. त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. जत नगरितून देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्याकडे नेली जाते. ही देवीची पालखी व मानाचे झग घेऊन पुजारी राजवाड्यावर पोहचताच श्रीमंत डफळे परिवाराच्यावतीने सर्वांचे स्वागत करण्यात येते. यावेळी श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, यांनी श्री.यल्लमादेवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी ,पालखीचे मानकरी श्री.विजय कोळी,झगाचे मानकरी काराजंगीयेथील ललीता कांबळे आदींचे आहेर माहेर देऊन सन्मान करतात.
यावेळी श्रीमंत डफळे परिवाराच्यावतीने श्रीमंत उर्वशीराजे डफळे व श्रीमंत अमृताराजे डफळे यांनी श्री.यल्लमादेवीची खणानारळाने ओटी भरली. श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी भगवान परशुरामाची पुजा केली. यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली. त्यानंतर देवीचे पुजारी नगरप्रदक्षिणेसाठी घोड्यावर बसून सोबत देवीची पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी डफळे यांच्या राजवाड्यातून बाहेर पडले.
जत नगरितील मानकरी जतचे पोलीस पाटील मदन माने-पाटील, खानविलकर, अजिंक्य सावंत व कुंभार यांच्या घरी देवीचे आहेर माहेर करित पुढे पालखी मार्गावरून मंदिर परिसरात आली. त्यानंतर देवीची पालखी व मानाचे झग मंदिर प्रदक्षिणा करण्यास निघाले यावेळी ठिकठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले झग घेऊन हजारो यल्लमाभक्त ,जोगतीनी मंदिर पालखी प्रदक्षीणेत सहभागी झाले होते.
जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सांगली येथील बॉम्ब शोधक नाशक पथकाचे प्रमुख जी. पी. एस. आय. मारुती मोटे हे फॅलोरे या श्वानासह हजर होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
देवीच्या पालखीच्या पाच मंदिर प्रदक्षीणा पार पडल्यानंतर देवीची पालखी ही किचाचे ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर देवीचे पुजारी हे किचाकडे निघत असताना तें अचानक मागे आले. व मंदिरात गेले आज पर्यंत च्या इतिहासात व देवीच्या यात्रेत कीचासाठी अग्निकुंडाकडे निघालेले पुजारी कधीच पाठीमागे येऊन मंदिरात गेल्याचे घडले नाही त्यामुळे भाविकात उलट सुलट चर्चा होत होती. त्यानंतर पुजारी हे किच (अग्नीकुंड) भोवती प्रदक्षीणा घालू लागले त्यांच्या सोबत कोळी समाजाच्या सुवासिनी महिला डोक्यावर अंबीलाच्या घागरी घेऊन पालखीसोबत किचाच्या ठिकाणी पेटवलेल्या धगधगत्या अग्नीकुंडासभोवती प्रदक्षिणा घालत होत्या.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे,तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील, भास्कर जाधव, माजी नगरसेवक परशुराम मोरे , अरूण शिंदे, कैलास आदाटे, पापा सनदी, मोहन माने-पाटील, राजेंद्र मानेसर, शाहू भोसले, पोलीस पाटील मदन मानेपाटील, अजिंक्य सावंत, विक्रम ढोणे, दिलीप सोलापुरे, निलेश बामणे, दिलीप तुराई, श्रीकृष्ण पाटील, गणपतराव कोडग, संग्राम राजेशिर्के, कैलास गायकवाड, शिवसेना नेते दिनकर पतंगे, मोहन चव्हाण, अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील वर्षांत भरविण्यात येणा-या यात्रेची घोषणा केली व पत्रक वाटप केले. श्री यल्लमादेवीची पुढील यात्रा ही दि. २०२६ मध्ये भरणार नसून ती ४ जानेवारी ते दि. ७ जानेवारी २०२७ पर्यंत भरविण्यात येणार असलेची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
यात्रेचे स्वरूप असे दि. ४ जानेवारी २०२७ देवीचा गांधोटगीचा दिवस, दिनांक ५ जानेवारी २०२७ रोजी देवीच्या महानैवेद्य दिवस दिनांक ६ जानेवारी. २०२७ रोजी देवींचा किचाचा दिवस तर ७ जानेवारी रोजी अमावस्या असे २०२७ मध्ये भरविण्यात येणाऱ्या पुढील यात्रेचे स्वरूप आहे.
आज देवीचे पुजारी श्री. सुभाष कोळी हे कीच प्रवेश केल्यानंतर देवीचे दरवाजे भाविकांना दर्शना साठी बंद करण्यात आले असून शुक्रवारी अमावस्या असल्याने त्या दिवशी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.
यावेळी यात्रेत पे पार्कींग व पोलीस यांच्याकडून यात्रेकरूंची मोठ्याप्रमाणात लुबाडणूक सुरू होती.पे पार्कींगवाले जबरदस्तीने रस्त्यावरून जाणारी वाहने पे पार्कींगमध्ये लावायला लावत होते. तर यावेळीही यात्रेत अवैध व्यवसाईकाकडून यात्रेकरूंची लुबाडणूक सुरु होती. यात्रेतील जागेवर मोठया प्रमाणात अतिक्रमने झाल्याने या वेळी यात्रेत या अतिक्रमित जागेवर ५० वर पे पार्किंग चे बोर्ड लागल्याचे दिसत होते. पे पार्किंगवाले पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लुबाडणूक करीत होते.
जत यात्रेत मोठया प्रमाणात खिलार जनावरांचा बाजार भरविण्यात आला असून या जनावर बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असलेचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले. जतचे आमदार गोपीचंद पडळकर व समर्थक कार्यकर्त्यांनी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही मोफत आन्नछत्र सुरु केले असून हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला व आ. पडळकर यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. श्री. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधीपती व श्री संत बागडे बाबांचे शिष्य ह. भ. प. तुकारामबाबा महाराज हे गेली १७ वर्षे जत यल्लमा यात्रेतील भाविकांना मोफत दहा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करतात. त्याच प्रमाणे येळवी येथील व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले सुनील कदम हे अनेक वर्षांपासून यात्रा कालावधीत देवीला लागणाऱ्या पूजेची फुले मोफत पूरवितात ही यात्रा बारा बलुतेदार दारांच्या सहकार्याने पार पाडली जाते.
सध्या यात्रा ज्या जागेवर भरविली जाते त्या जागेवर मोठया प्रमाणात अतिक्रमने झाली आहेत. यातून ही यात्रा ज्या खिलार जनावरासाठी प्रसिद्ध आहे. तो जनावरांचा बाजार ही या अतिक्रमण धारकांनी सोडला नाही. पुढील काळात जनावरांचा बाजार भरवायचा कोठे असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे. त्यामुळे भविष्यात ही यात्रा मोडकळीस आल्या शिवाय राहणार नाही असा संताप श्री. यल्लमा भक्तांनी व्यक्त केला आहे.


