yuva MAharashtra जमिनीच्या वादात दोन शेतकऱ्यांकडून शालेय रस्ता बंद | आमदार निधीतून झालेला रस्ता अडथळ्यात विद्यार्थ्यांचे हाल

जमिनीच्या वादात दोन शेतकऱ्यांकडून शालेय रस्ता बंद | आमदार निधीतून झालेला रस्ता अडथळ्यात विद्यार्थ्यांचे हाल

जत वार्ता न्यूज
By -

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा ; सरपंच बसवराज तेली

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत तालुक्यातील सोन्याळ ग्रामपंचायत हद्दीतील नदाफ फाटा ते परीटवस्ती प्राथमिक शाळेकडे जाणारा सार्वजनिक व शालेय रस्ता जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे बंद केल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोन्याळ ग्रामपंचायतचे सरपंच बसवराज तेली यांनी उपविभागीय अधिकारी जत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हा रस्ता बंद केल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क धोक्यात आला आहे. 
  याबाबत अधिक माहिती अशी की, नदाफ फाट्यापासून परीटवस्ती प्राथमिक शाळेकडे जाणारा हा रस्ता दोघांच्या जमीन वादात एका शेतकऱ्यांनी काटे टाकून व  दगड आणि मातीचा बांध घालून पूर्णतः बंद केला आहे. परिणामी, लहान विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य झाले असून, पर्यायी मार्ग अत्यंत लांब व धोकादायक असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे चित्र आहे.

आमदार निधीतून विकसित रस्त्यावर बेकायदेशीर अडथळा; 
    सदर रस्त्यावर सन २०१२-१३ मध्ये तत्कालीन आमदार  प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या आमदार निधीतून अधिकृतरीत्या मुरमीकरण व रस्ता सुधारणा करण्यात आली होती. शासनाच्या सार्वजनिक निधीतून तयार झालेल्या रस्त्यावर खासगी व्यक्तींनी केवळ वैयक्तिक जमीन वादातून अडथळा निर्माण करणे हा गंभीर प्रकार असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन शेतकऱ्यांपैकी एकाने अर्धा रस्ता खुला करण्याची तयारी दर्शवली असली, तरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या नकारामुळे संपूर्ण सार्वजनिक व शालेय रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याची मागणी;
   विद्यार्थ्यांचे शिक्षण, ग्रामस्थांचे हक्क आणि सार्वजनिक हित लक्षात घेता, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तात सदर शालेय रस्ता त्वरित खुला करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारचा अडथळा पुन्हा निर्माण होणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी सरपंच बसवराज तेली यांनी केली आहे.
     प्रशासनाने वेळेत कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत स्तरावर तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या निवेदनाची माहितीस्तव प्रत अपर तहसीलदार, संख  तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक, उमदी पोलीस स्टेशन यांनाही पाठवण्यात आली आहे.