yuva MAharashtra अमावस्येला यल्लमादेवीच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर, लाखो भाविकभक्तांनी देवीला नैवेद्य दाखवून गंध नेसून फेडला नवस

अमावस्येला यल्लमादेवीच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर, लाखो भाविकभक्तांनी देवीला नैवेद्य दाखवून गंध नेसून फेडला नवस

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी श्री.यल्लमादेवीची यात्रा नुकतीच पार पडली. देवीच्या किच कार्यक्रमापूर्वी देवीचे पुजारी सुभाष कोळी हे मानकरी कोळी समाजाच्या महिलांकडे असलेल्या देवीच्या अंबिलाच्या घागरीची पूजा करून परत देवळात येऊन देवींची आरती करून देविपुढे भक्तांचे गाऱ्हाने मांडून देवीचा दरवाजा बंद करून कीचाकडे गेले होते. कीच कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा शुक्रवारी रात्री बारानंतर उघडण्यात आला. पहाटे देवीचा अभिषेक केला, त्यानंतर देवीची पूजा व आरतीनंतर देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले झाले.
     पुढील वर्षात २०२६ मध्ये श्री यल्लमा देवींची यात्रा भरविली जाणार नसून देवीची पुढील यात्रा ही दि. ४ ते ७ जानेवारी २०२७ या कालावधीत भरणार असून ४ जानेवारी रोजी देवीचा गंध, दि. ५ जानेवारी रोजी देवीचा नैवेद्य, दि. ६ जानेवारी रोजी देवीचा कीच व दि. ७ रोजी अमावस्या असे यात्रेचे दिवस आहेत.
     मार्गशीर्ष अमावशा असल्याने सकाळपासूनच देवीचे दर्शनासाठी भाविकभक्तांची मोठी रांग दिसून येत होती.जत पंचक्रोशीतील भाविक जे यात्रा कालावधित देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत ते भाविक भक्त व महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
     शुक्रवार देवीचा वार व मार्गशीर्ष अमावस्या असल्याने देवीचे हजारो भाविकभक्त ज्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या निवारण्याचे व देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी नवस केले होते ते सर्वजण मंदिरापासून पाचशे मिटर अंतरावर असलेल्या पुरूष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या स्नानकुंडात स्नान करून ओलेत्या अंगाने मंदिर परिसरात असलेल्या देवदासी व जोगतीनीकडून सर्वांगाला गंध लावून घेऊन तसेच कमरेला लिंबाचे डहाळे बांधून घेऊन तोंडात लिंबाची पाने धरून मंदिरासभोवती उदं ग आई उदो,यल्लू आईचा उदो चा जयघोष करित नवस फेडून देवीचे दर्शन घेत होते. 
     त्याचप्रमाणे आजही लाखो भाविक भक्तांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवीला. यावेळी अनेक भाविकांनी यात्रा परिसरातच तीन दगडाची चूल तयार करून त्यावर पुरणपोळीचा नैवेद्य बनविला व देवीला दाखविला. यात्रा समाप्तीनंतर आज परत मोठ्याप्रमाणात यात्रा भरलेचे दिसत होते. पंढरपूर येथील मेवामिठाई चे व्यवसाईक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती. यात्रेतील सर्वच गल्ल्या आज यात्रेकरूंनी भरून गेल्या होत्या.यात्रेत आकाशी पाळणे, मौत का कुवा,यासह लहानमोठे दोन डझनावर पाळणे आल्याने व ईतर अनेक मनोरंजनाची साधने आल्याने आज यात्रेकरूंनी त्याचा मनमुराद आनंद लुटला.
     जत यात्रेत श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान व यात्रा कमिटीने केलेल्या नवीन नियोजनामुळे यात्रेत आलेल्या भाविकांचा मोठा गोंधळ उडालेचे दिसून आले. यात्राकरू व भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रतिष्ठानच्या मालकीच्या जागेच्या उत्तर बाजूची वर्षानुवर्षे यात्रेसाठी राखीव असलेल्या जागेवर मोठया प्रमाणात सत्ता व संपत्ती च्या बळावर धन दांडग्यानी बेकायदेशीर पणे प्लॉटिंग केल्याने व या धनदांडग्याकडून प्रतिष्ठानला त्रास होऊ लागल्याने प्रतिष्ठानने बिळूर रस्त्याचे बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे गंधर्व ओढापात्रापर्यंत सात फूट उंचीची आर. सी. सी. ची भिंत उभी करून त्या भिंतीच्या दक्षिण बाजूला ही यात्रा भरविल्याने व यावर्षी यात्रेच्या स्वरूपात मोठा बदल केल्याने भाविक व यात्रेकरू गोंधळून गेले होते.
     पे पार्कींगच्या नावाखाली यात्रेत आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यातच अडवून पे पार्कींग वाले त्यांना लुबाडताना दिसत होते. अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी  यात्रेचे यापेक्षाही चांगल्या प्रकारे नियोजन करावे, यात्रेकरूंसाठी सर्व प्रकारच्या सुखसोई उपलब्ध करूण द्याव्यात अशी अपेक्षा यात्रेकरूंनी व्यक्त केली.
     प्रतिष्ठान चे सेवेकरी पापा सनदी, मोहन माने-पाटील, कैलास गायकवाड, गणपतराव कोडग, मोहन शिंदे, चंद्रकांत कोळी, मोहन चव्हाण, बंडू दुधाळ, अनिल शिंदे, दिनकर पतंगे, अरूण शिंदे,अमर जाधव, आदीनी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे दर्शन घडावे यासाठी चांगले सहकार्य केले.