yuva MAharashtra मतांसाठी रोजगार, सत्तेनंतर बेदखल; एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थींवर सरकारचा विश्वासघात

मतांसाठी रोजगार, सत्तेनंतर बेदखल; एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थींवर सरकारचा विश्वासघात

जत वार्ता न्यूज
By -

जुन्यांना न्याय नसेल तर सरकार चालू देणार नाही; तुकाराम बाबांचा थेट इशारा

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील तब्बल एक लाख ३४ हजार बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत सामावून घेत रोजगाराची संधी दिली. गावातच रोजगार मिळाल्याने तरुणांनी महायुतीला निवडणुकीत कौल दिला. मात्र निवडणूक संपताच या तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत असून, आता “काम सरो, वैद्य मरो” अशी अवस्था झाल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
    सरकारने १ जानेवारीपासून जुन्या प्रशिक्षणार्थींच्या जागी नवीन भरती करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेचे लढवय्ये नेते हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला थेट इशारा दिला.
“जुन्या युवा प्रशिक्षणार्थींना न्याय न देता नवीन भरती केल्यास संबंधित शासकीय कार्यालयांना टाळे ठोकू व आमरण उपोषण सुरू करू,” असा स्पष्ट इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला.
     तुकाराम बाबा म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. सहा महिन्यांच्या या योजनेत सहभागी असलेल्या तरुणांना आंदोलनानंतर पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी सेवा दिली, तेथेच त्यांना कायमस्वरूपी संधी देण्याची आमची मागणी वर्षभरापासून प्रलंबित आहे. शासनाने या तरुणांची अक्षरशः चेष्टा लावली असल्याचा आरोप त्यांनी केला.
     हक्काच्या रोजगारासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने करणाऱ्या प्रशिक्षणार्थींवर नागपूर येथे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, हा कोणता न्याय? असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा महाराज यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
     सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह संपूर्ण राज्यात युवा प्रशिक्षणार्थी आपल्या हक्कासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र शासन त्यांच्या भावना व परिस्थिती समजून घेण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “जुन्या एक लाख ३४ हजार बेरोजगारांना न्याय देता येत नसेल, तर नवीन भरती करून शासन बेरोजगारांची फॅक्टरी काढू पाहत आहे का?” असा घणाघाती सवालही तुकाराम बाबा महाराज यांनी उपस्थित केला.
     प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलेल्या प्रमाणपत्राचाही काही उपयोग नाही. त्यावरच तशी मर्यादा नमूद असल्याने तरुणांचे भवितव्य अंधारात आहे. आंदोलनादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र चार महिने उलटून गेले तरी ती भेट घडलेली नाही. “राज्यकर्त्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा?” असा सवालही यावेळी करण्यात आला.
बेरोजगारांची ‘फॅक्टरी’; मानधनही मिळेना;
     राज्यातील एक लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना शासनाने नियुक्ती दिली, मुदतवाढही दिली; मात्र प्रत्यक्षात सेवा देऊनही अनेक प्रशिक्षणार्थींना आजपर्यंत मानधन मिळालेले नाही. सध्याच्या तरुणांचे मानधन रोखून धरत नव्या भरतीची तयारी करणारे शासन बेरोजगारांची फॅक्टरी निर्माण करत आहे का, असा थेट आरोप हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केला.