श्री रामराव विद्यामंदिर, जत येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय ग्राहक दिन यानिमित्त जत तहसील कार्यालयाच्या वतीने श्री रामराव विद्यामंदिर, जत येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रविण धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे, पुरवठा निरीक्षक क्षितिज पाटील, पुणे विभागीय उपाध्यक्ष विद्याधर किट्टद, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, तालुका अध्यक्ष इब्राहिम नदाफ, नागनाथ मोटे, सरक सर यांच्यासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना तहसीलदार प्रविण धानोरकर म्हणाले की, ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करताना एम.आर.पी., एक्सपायरी तारीख, वजन व दर्जा तपासूनच खरेदी करावी. कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यानंतर अधिकृत व पक्के बिल घेणे हा ग्राहकाचा मूलभूत हक्क असून भविष्यातील तक्रार निवारणासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच, मात्र ग्राहकांनीही ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेनुसार स्वतः सतर्क राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील नवीन तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच ग्राहकांनी फसवणूक झाल्यास घाबरून न जाता ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले. आता ग्राहक आपली तक्रार घरबसल्या ‘ई-दाखल’ पोर्टलच्या माध्यमातून कशी नोंदवू शकतात, याची सविस्तर माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेच्या वतीने करण्यात आले. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे उपस्थित ग्राहकांमध्ये हक्कांविषयी जागृती निर्माण झाली.


