जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुका काँग्रेस कामगार सेलच्या वतीने ‘आशा’ हा मराठी चित्रपट आशा व गटप्रवर्तकांसाठी मोफत दाखविण्यात आला. आशा आरोग्य सेविकांच्या समर्पित सेवाभावाचे प्रातिनिधिक दर्शन घडविणारा हा चित्रपट त्यांच्या संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक योगदानाचे प्रभावी चित्रण करतो.
चित्रपटात रिंकू राजगुरू यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाला स्थानिक नागरिकांसह उपस्थित आशा वर्कर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्क्रीनिंगदरम्यान मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याप्रसंगी जत तालुका काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष मधुकर नरळे म्हणाले, “आशा व गटप्रवर्तकांच्या कार्याला मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्या कामाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक आरोग्य सेवेत कार्यरत महिलांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळेल.”
कार्यक्रमात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद केले. त्यांच्या कार्याचे कौतुक करणे व त्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला बाबासाहेब कोडग, डॉ. खिल्लारे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, विकास माने, निलेश बामणे, प्रकाश माने, सौ. योगिता बामणे, आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉ. मीना कोळी, सीटू जिल्हा सचिव कॉ. हणमंत कोळी, अमोल बाबर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने आशा वर्कर्स उपस्थित होते.
कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना संविधानिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कॉ. हणमंत कोळी व कॉ. मीना कोळी यांचा सपत्नीक सत्कार मा. आ. विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. आशा वर्कर्सना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करून त्यांच्या अनुभवांवर चर्चा करण्यात आली.


