yuva MAharashtra माडग्याळ तालुका निर्मितीसाठी पाठपुरावा तीव्र | माजी जि.प. सदस्य तम्मनगौडा रवीपाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट | निवेदन सादर

माडग्याळ तालुका निर्मितीसाठी पाठपुरावा तीव्र | माजी जि.प. सदस्य तम्मनगौडा रवीपाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट | निवेदन सादर

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेच्या दीर्घकालीन आणि रास्त मागणी असलेल्या माडग्याळ स्वतंत्र तालुका निर्मितीच्या प्रस्तावासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवीपाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष पाठपुरावा केला. यावेळी त्यांनी माडग्याळ तालुका घोषित करावा, अशी ठाम मागणी करणारे सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर केले.
     निवेदनात माडग्याळ हे जत तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती व भौगोलिकदृष्ट्या सोयीचे ठिकाण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. माडग्याळ तालुका झाल्यास सुमारे ४५ ग्रामपंचायतींना थेट प्रशासकीय लाभ होणार असून, नागरिकांना दळणवळण, वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी यापूर्वीच ग्रामसभा व मासिक सभांमधून माडग्याळ तालुक्यासाठी ठराव मंजूर करून पाठिंबा दर्शविला आहे.
     निवेदनात संख व उमदी या गावांमधील भौगोलिक व सामाजिक अडचणी, पावसाळ्यात ओढ्यामुळे निर्माण होणारे पूरपरिस्थितीचे संकट, निवडणुकीच्या वेळी मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याच्या घटना यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर उमदीसारखी सीमावर्ती गावे सुरक्षित प्रशासनिक नियंत्रणाखाली येणे आवश्यक असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
     माडग्याळ येथे आधीपासूनच ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार, आठवडा बाजार, पोलिस आऊटपोस्ट, सब पोस्ट ऑफिस, महावितरण कार्यालय, शैक्षणिक संस्था, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच प्रशासकीय कार्यालयांसाठी मुबलक शासकीय जागा उपलब्ध असल्याने तालुका मुख्यालयासाठी माडग्याळ हा सर्वार्थाने योग्य पर्याय असल्याचे रवीपाटील यांनी स्पष्ट केले.
     
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन स्वीकारून प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. माडग्याळ तालुका निर्मितीच्या दिशेने हा पाठपुरावा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे परिसरातील जनतेमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.