जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जत येथील सुप्रसिद्ध व्यापारी बाबुराव पट्टणशेट्टी यांचे नातू अथर्व अनिल पट्टणशेट्टी यांनी सामाजिक व धार्मिक जाणीवेचे दर्शन घडवत श्री बिसल सिद्धेश्वर मंदिरास तब्बल एक लाख रुपयांचे दान मंदिराच्या अधिकृत खात्यावर कोणालाही न सांगता जमा केले. या मूक दानामुळे जत परिसरात कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.
मंदिराच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेबाबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी बँकेत चौकशी केली असता, ही रक्कम पट्टणशेट्टी कुटुंबाच्या वतीने देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दान करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर ही रक्कम अथर्व अनिल पट्टणशेट्टी यांनी दिल्याचे समजले.
या प्रेरणादायी कार्याबद्दल देवस्थान कमिटीच्या वतीने अध्यक्ष मधुकर शिंदे, सचिव बबन शिंदे व सदस्य समाधान शिंदे यांनी अथर्व पट्टणशेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी अथर्व यांच्या धार्मिक भावनेचे व सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक करण्यात आले.
अल्पवयातच कोणताही गाजावाजा न करता देवस्थानासाठी मोठी रक्कम दान करून अथर्व पट्टणशेट्टी यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारच्या मूक व निःस्वार्थ दानातूनच धार्मिक स्थळांचा विकास होत असून तरुण पिढीने अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या सत्कारप्रसंगी पट्टणशेट्टी कुटुंबीय उपस्थित होते. अथर्व पट्टणशेट्टी यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जत शहरात सर्वत्र कौतुकाचा सूर उमटत आहे.

