जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. ७ ते १० या भागात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने या प्रभागात भाजपचे थेट प्रतिनिधित्व उरलेले नाही. मात्र, अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता नगरपरिषदेवर स्थापन झाल्याने या प्रभागाच्या विकासासाठी कुंभार कुटुंबातील व्यक्तीस स्वीकृत सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी प्र. ८ मधील कुंभार समर्थकांनी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्याकडे केली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने प्रभाग ८ मधून माजी नगरसेविका सौ. शारदाताई चंद्रकांत कुंभार यांना तर प्रभाग १० मधून त्यांचे चिरंजीव इंजि. पवन कुंभार यांना उमेदवारी दिली होती. प्रभाग १० मध्ये सुरुवातीला अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांच्याशी भाजपकडून उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. मात्र, नदाफ यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने ऐनवेळी भाजपकडे उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, शिवनेरी व शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचे चिरंजीव इंजि. पवन कुंभार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.
या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंजि. पवन कुंभार यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वतः घेतली होती. मात्र, मतमोजणीअंती इंजि. पवन कुंभार व अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना समसमान मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिठ्ठी काढण्यात येऊन फिरोज नदाफ यांना विजयी घोषित करण्यात आले, तर इंजि. पवन कुंभार हे टायमध्ये पराभूत झाले.
या निकालामुळे कुंभार कुटुंबियांबरोबरच त्यांच्या समर्थकांमध्येही तीव्र नाराजी व दुःख व्यक्त करण्यात येत आहे. प्रभाग ८ मधून सौ. शारदा कुंभार व प्रभाग क्रमांक १० मधून इंजि. पवन कुंभार पराभूत झाल्यानंतर निकाल जाहीर झाल्यापासून कुंभार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, प्रभाग १० मधील अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी मोठी रसद व मदत पुरवल्यानेच निकालानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवीत असताना एका विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठीच ही रणनीती आखली गेली, असा आरोपही कुंभार समर्थकांकडून केला जात आहे.
प्रभाग ७ ते १० या भागात भाजपचे थेट निवडून आलेले नगरसेवक नसल्याने या प्रभागाचा विकास खुंटू नये, यासाठी कुंभार कुटुंबातील सदस्याला स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी ठाम मागणी कुंभार समर्थकांनी केली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने काहींना स्वीकृत सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिल्याचीही चर्चा असून, त्यात कुंभार कुटुंबाचा समावेश होणार का, याकडे आता शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

