२० ते २५ गावांचा कडकडीत बंद; शासनाच्या उदासीनतेमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र माडग्याळ तालुका निर्माण करण्याच्या मागणीसाठी माडग्याळ येथे ग्राम सचिवालय परिसरात सुरू असलेले चक्रीय व अमरण उपोषण मंगळवारी आठव्या दिवशीही सुरूच होते. याला पाठिंबा देण्यासाठी माडग्याळसह परिसरातील सुमारे २० ते २५ गावांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून संबंधित गावांमध्ये एकही दुकान उघडलेले नव्हते. त्यामुळे परिसरात शंभर टक्के बंदचे चित्र दिसून आले.
स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे महादेवाप्पा अंकलगी, मन्सूर चाचा खतीब, विवेक कोकरे, लकडेवाडीचे माजी सरपंच एकनाथ बंडगर, जाडर-बोबलादचे सरपंच रामनिंग निवर्गी, गुड्डापूरच्या सरपंच कविता पुजारी, सोसायटी चेअरमन धानाप्पा पुजारी, कोळगिरीचे सरपंच अनिश हेळवी, वंचित बहुजन आघाडीचे जत तालुकाध्यक्ष विठ्ठल पुजारी, चंदू पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला.
माडग्याळ, व्हसपेठ, लकडेवाडी, सोन्याळ, कुलाळवाडी, बंडगरवाडी, गुड्डापूर, राजोबाचीवाडी, कोळगिरी आदी गावांतील नागरिकांनी गाव बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत आंदोलन अधिक तीव्र केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते कृष्णदेव गायकवाड म्हणाले की, “स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच माडग्याळ स्वतंत्र तालुक्यासाठी शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने ठोस दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.”
माडग्याळ स्वतंत्र तालुका व्हावा, यासाठी जत पूर्व भागातील तब्बल ४८ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव माडग्याळच्या बाजूने मंजूर केलेले आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या लिंबाजी माळी, निंगाप्पा कोरे, कामान्त्रा बंडगर, प्रकाश माळी, तुकाराम कोरे आणि नागेश ऐवाळे हे सहा युवक अमरण उपोषण करत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठा जनसागर उपोषणस्थळी लोटल्याचे चित्र होते. जाडर-बोबलाद, सोन्याळ, लकडेवाडी, गुड्डापूर, व्हसपेठ, कुलाळवाडी व कोळगिरी येथील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चक्रीय उपोषणात सहभाग नोंदवला. विविध संघटनांनी लेखी पत्र देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “आगामी काळात रस्ता रोकोसह लोकशाही मार्गाने विविध आंदोलने छेडली जातील,” असा इशारा माडग्याळ ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव माळी यांनी दिला. मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“आंदोलन सुरू ठेवा, आमचा संपूर्ण पाठिंबा” – मन्सूर चाचा खतीबमाडग्याळ तालुक्याचा विषय फार पूर्वीपासून चर्चेत असून प्रशासनाचा अहवालही माडग्याळच्या बाजूने आहे. माडग्याळ सर्व सोयींनी संपन्न असून गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे मन्सूर चाचा खतीब यांनी स्पष्ट केले.
वाजत-गाजत पाठिंबा;व्हसपेठ गावाने कडकडीत बंद ठेवत सरपंच पूनम तुराई यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी वाजत-गाजत माडग्याळमध्ये फेरी काढून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. अनेक गावांनी गट-तट विसरून गाव बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिल्याने परिसरात आंदोलनाचा जोर वाढला आहे.

