दोन तासांत कारवाई; चार आरोपी अटकेत, २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२०२५ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३०९, ३२४, १२६(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
घटनेचा तपशील;
दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोलापूर–कोल्हापूर महामार्गावरील मिरज शहर हद्दीतील शंभू हॉटेलजवळ ही घटना घडली. फिर्यादी शितलकुमार बलवंत माने (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे आपल्या बहिणीसह उपचारासाठी कोल्हापूरहून मिरजकडे येत असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोपेड अडवली.
आरोपींनी स्वतःला खासगी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे सांगत मोपेडचे कर्ज थकित असल्याचे कारण पुढे केले. पार्किंग यार्डमध्ये वाहन जमा करावे लागेल तसेच १२ हजार रुपये दंड भरावा लागेल, अशी धमकी देण्यात आली. पैसे न दिल्यास बहिणीस मारहाण व जीवघेणी इजा करण्याची धमकी देत आरोपींनी जबरदस्तीने ८ हजार रुपये ऑनलाईन उकळले. तसेच मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केले.
पोलीस कारवाई;
घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेले आरोपी;
विपुल किशोर भोरे (वय २५, रा. एमएसईबी बोर्डजवळ, सांगली)
आलोक परशुराम वायदंडे (वय १९, रा. तानंग, ता. मिरज)
मयुरेश दीपक मोटे (वय २०, रा. रामरहीम कॉलनी, संजय नगर, सांगली)
राजू मनीष परिहार (वय ३०, रा. सवोदय पार्किंग यार्डजवळ, सोलापूर हायवे, मिरज)
जप्त मुद्देमाल;
७५,००० रुपये किमतीची सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड
१,००,००० रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट
पोलीसांचे आवाहन;
सांगली जिल्ह्यात फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून वाहनधारकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. कोणतीही व्यक्ती वाहन जप्ती, दंड किंवा पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

