जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जत तहसील कार्यालयात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तालुक्याचा सर्वांगीण, समतोल व लोकाभिमुख विकास साधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
या बैठकीस प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रावी धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी विकासकामांबाबत स्पष्ट आणि ठाम सूचना दिल्या. जनतेशी थेट संबंधित असलेली कोणतीही विकासकामे प्रलंबित ठेवू नयेत, सर्व कामांना तातडीने मंजुरी देऊन ती गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करावीत, तसेच शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्त्यांबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, त्यांची दुरुस्ती, सुधारणा व पुढील नियोजन यावर सविस्तर आणि उपाययोजनात्मक चर्चा करण्यात आली. पाणंद रस्ते शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या रस्त्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करून अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले. प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून कार्य करावे, जनतेच्या अडचणींवर तत्काळ प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.
जत तालुक्याचा गतिमान विकास साधण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज असून, त्या दृष्टीने ही आढावा बैठक दिशादर्शक ठरली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

