जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या सत्कार समारंभात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करताना म्हटले की, “जनतेने दिलेला हा विश्वास जपून जत शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करावे. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत ठोस आणि परिणामकारक काम होणे अपेक्षित आहे.” तसेच त्यांनी पारदर्शक आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारे प्रशासन निर्माण करण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेने दिलेल्या विश्वासाचा सन्मान राखत, जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. लोकशाही प्रक्रियेतून मिळालेल्या या विजयामागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, नेतृत्वाची दूरदृष्टी आणि मतदारांचे मोलाचे पाठबळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या विजयाला जनतेच्या अपेक्षांची जोड असून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा सत्कार समारंभ केवळ गौरवाचा क्षण नसून, जत शहराच्या प्रगतीसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. जनहित, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख धोरणांद्वारे जत नगरपरिषदेला एक आदर्श नगरपरिषद बनवण्याचा निर्धार या समारंभात करण्यात आला.
समारंभाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी व जनतेच्या हिताचा कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

