खोटे खणखणीत वाजते, खरे दारोदार फिरते
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सध्याचा काळ अत्यंत कठीण असून खरे माणूस दारोदार फिरत आहे, तर खोटे नाणे खणखणीत वाजत आहे. संस्कारांची शिदोरी कमी पडत चालली असून मजुरांच्या अभावामुळे शेती करणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत तरुणाई भरकटत चालली असल्याची खंत व्यक्त करत येत्या पाच वर्षांत परिस्थिती आणखी बदलू शकते, तेव्हा तरुणांनी हुशारीने वागावे, असे आवाहन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले.
येळवी येथील ओंकारस्वरूपा कॉलेज मैदानावर स्व. ह.भ.प. विठोबा जमदाडे व लोचनाबाई विठोबा जमदाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
इंदुरीकर महाराज यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना शेती जरूर करा, मात्र पोट भरण्यासाठी कोणतीही एक कला किंवा कौशल्य आत्मसात करा, असा सल्ला दिला. आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे वागू नका, संस्कार जपा, व्यसनांपासून दूर राहा, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील नैतिक घसरण, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार व अंधश्रद्धांवर त्यांनी आपल्या खास शैलीत परखड प्रहार केला.
यावेळी शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दऱ्याप्पा जमदाडे व माजी सरपंच मारुती जमदाडे यांच्या हस्ते इंदुरीकर महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
जमदाडे कुटुंबीयांनी सांगितले की, प्रकाश जमदाडे यांचे आई-वडील स्व. ह.भ.प. विठोबा जमदाडे व लोचनाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यभर पंढरपूरची एकादशी वारी अखंड सुरू ठेवली. आज त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे, ही त्यांच्या संस्कारांचीच साक्ष आहे. आई-वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणूनच या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आळंदीचे ह.भ.प. शेटे महाराज, ह.भ.प. कैलास महाराज व ह.भ.प. उद्धव माऊली शिंदे यांनी नायक साथ दिली. ह.भ.प. राजाराम महाराज देवडकर (आळंदी) व ह.भ.प. नितीन महाराज हारकळ यांनी वादनाची साथ दिली. दिघंची येथील श्री विश्व माऊली अध्यात्मिक केंद्राचे सचिन महाराज कुंभार व त्यांचा ग्रुप उपस्थित होता. कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आभार प्रशांत जमदाडे यांनी मानले.


