yuva MAharashtra खोकीधारक व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी सदैव कटिबद्ध – नूतन नगरसेवक गौतम ऐवाळे

खोकीधारक व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी सदैव कटिबद्ध – नूतन नगरसेवक गौतम ऐवाळे

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत शहरातील खोकीधारक, कष्टकरी, हॉकर्स (फेरीवाले) तसेच हातगाडा चालक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही जतचे नूतन नगरसेवक गौतम ऐवाळे यांनी दिली.
     जत शहरातील तहसील कार्यालयासमोरील खोकीधारक संघटनेच्या वतीने नूतन नगरसेवक गौतम ऐवाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऐवाळे म्हणाले की, शहराच्या सुशोभीकरणाच्या किंवा विकासात्मक नियोजनाच्या नावाखाली खोकीधारक, फेरीवाले व हातगाडा चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.
     “मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्यातूनच पुढे आलो आहे. त्यामुळे तुमच्या घामाचे मोल आणि रोजच्या संघर्षाची मला पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही अडचणीत मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असे भावनिक उद्गार नगरसेवक गौतम ऐवाळे यांनी काढले.
     या कार्यक्रमास प्रशांत पाथरूट, प्रमोद संकपाळ, रवी स्वामी, नजीर शेख, पांडुरंग सूर्यवंशी, दन्याप्पा साळे, विश्वजीत कोळी, आमसिद्ध गडदे, फाल्गुनी शिंदे, चंद्रकांत शिंदे, प्रदीप वाघमारे, सागर पुजारी, रामभाऊ कोळी यांच्यासह अनेक खोकीधारक व नागरिक उपस्थित होते.
Tags: