जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सांगली जिल्हा विज्ञान व गणित असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सांगली येथे उत्साहात पार पडली. या सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना व पुनर्बांधणी करण्यात आली. यावेळी जत येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक माननीय श्री राजेंद्र विलासराव माने यांची सांगली जिल्हा विज्ञान व गणित असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
श्री राजेंद्र माने हे गेल्या दहा वर्षांपासून जत तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी या काळात शिक्षक संघटन, विद्यार्थी गुणवत्तावाढ, विज्ञान–गणित विषयांतील उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे तसेच शैक्षणिक चळवळींमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विज्ञान महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष माननीय संभाजी शिंदे व सांगली जिल्ह्याचे नूतन कार्याध्यक्ष सुधीर ओलेकर यांनी त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली.
या निवडीमुळे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण असून, शैक्षणिक क्षेत्रातून श्री माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात असून, भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विज्ञान व गणित शिक्षण अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

