जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेले एस.टी. पिकअप शेड सध्या अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नविन, सर्व सोयींनी युक्त एस.टी. पिकअप शेड उभारण्यासाठी आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी तातडीने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवशंकर खटावे यांनी केली आहे.
जत–सांगली मार्गावरील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात उभारण्यात आलेले हे एस.टी. पिकअप शेड अनेक वर्षांपूर्वीचे असून त्याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने सध्या ते पूर्णतः मोडकळीस आले आहे. शेडचे छत, खांब व संरचना अत्यंत कमकुवत झाली असून कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही सांगली–मिरजकडे जाणारे प्रवासी तसेच परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उन्हाळा असो वा पावसाळा, याच धोकादायक पिकअप शेडचा आसरा घेण्यास मजबूर आहेत.
या जीर्ण अवस्थेमुळे केवळ प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला नसून शहराच्या सौंदर्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. छत्रपती शिवाजीमहाराज चौक हा जत शहराचा प्रमुख व नाक समजला जातो. मात्र, याच ठिकाणी असलेल्या मोडकळीस आलेल्या पिकअप शेडमुळे चौकाचे विद्रुपीकरण झाले असून शहराची प्रतिमा मलीन होत आहे.
याबाबत ॲड. शिवशंकर खटावे यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहराच्या सौंदर्यासाठी या ठिकाणी तातडीने नविन, मजबूत व सर्व सोयींनी युक्त एस.टी. पिकअप शेड उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी विशेष लक्ष घालून भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा व या पिकअप शेडचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील आणि प्रवाशांचा जीव वाचेल, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, नागरिक व प्रवाशांकडूनही या मागणीला पाठिंबा मिळत असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

