जतवार्ता न्यूज नेटवर्क;
माडग्याळ स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला शिवसेना विधानसभा प्रमुख महादेव हिंगमीरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. ग्रामसचिवालय परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडली.
माडग्याळ परिसरातील नागरिकांची प्रशासकीय, भौगोलिक व लोकसंख्येची गरज लक्षात घेता माडग्याळ हा स्वतंत्र तालुका होणे अत्यावश्यक असल्याचे हिंगमीरे यांनी यावेळी सांगितले. जत तालुक्याचे विभाजन करून माडग्याळ तालुका निर्माण करण्यात यावा तसेच प्रस्तावित तालुक्याची सर्व शासकीय कार्यालये माडग्याळ येथेच सुरू करण्यात यावीत, या प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणकर्त्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक यासह सर्व तालुकास्तरीय कार्यालये माडग्याळ येथे कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना महादेव हिंगमीरे म्हणाले,“माडग्याळ तालुका ही येथील जनतेची रास्त मागणी आहे. अनेक वर्षांपासून या भागाचा विकास रखडलेला आहे. शासनाने जनतेचा आवाज ऐकून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”
आंदोलनस्थळी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषण शांततेत सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.

