yuva MAharashtra मल्लेश पुजारी खून प्रकरणातील आरोपी अटकेत; अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा उलगडा

मल्लेश पुजारी खून प्रकरणातील आरोपी अटकेत; अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा उलगडा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क :
     जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मल्लेश सुरेश पुजारी (वय २३, रा. के. एम. हायस्कूलजवळ, सातारा रोड, जत) याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
     याप्रकरणी रोहित राजेंद्र माने (वय १९, रा. निगडी कॉर्नर, जत) व त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, मृत मल्लेश पुजारी व आरोपी यांच्यात वैयक्तिक कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाला अनैतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचे तपासात पुढे आले असून त्यातूनच हा खून केला असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
     सोमवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसरात मल्लेश पुजारी एकटा असल्याची संधी साधत आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
     पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपी रोहित माने याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारास बालन्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा केले जात आहेत.
     या घटनेमुळे जत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.