yuva MAharashtra जत येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

जत येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
     शहरातील विठ्ठलनगर परिसरातील श्री संत रविदास चर्मकार समाज बहुउद्देशीय संस्था येथे संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन, पूजन व पुष्पार्पण कार्यक्रम पार पडला.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रविदास महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले. समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांचा यावेळी वक्त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजजीवनात आजही त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अबाधित असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.
    नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी मनोगतात संत रविदास महाराजांचा सामाजिक ऐक्याचा व समतेचा संदेश आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते महेश शिंदे यांनी संतांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.
    या प्रसंगी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, रिपाइंचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक गौतम ऐवळे, मिथुन भिसे, कुमार साळे, महादेव कोळी, परशुराम मोरे, नगरसेविका डॉ. वीणा तंगडी, सीमा पट्टणशेट्टी, नंदिनी मठपती, पंचायत समिती सदस्य विजय रुपनूर तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सायंकाळी टाळ मृदंगाच्या गजरात संत रविदास महाराजांच्या मूर्तीची जत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनाथ बोरुटे व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.