जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड घालून जागीच खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मल्लेश सुरेश पुजारी (वय २३, रा. के. एम. हायस्कूल जवळ, सातारा रोड, जत) असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून व जत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मल्लेश पुजारी याच्यावर अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडाने डोक्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तो जागीच कोसळला असून रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या खुनामागे अनैतिक संबंधाचा वाद असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कशामुळे व कोणत्या पार्श्वभूमीवर झाली, याचा तपशीलवार तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून परिसरातील परिस्थितीची पाहणी केली तसेच नागरिकांकडून माहिती घेतली.
दरम्यान, तरुणाचा दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे जत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास जत पोलीस करत असून लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

