जत | प्रतिनिधी :
शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असताना, जत पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांकडून लाभार्थी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केला आहे. वाळेखिंडी येथील लाभार्थी शेतकऱ्यांसह त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहाराचा भंडाफोड केला.
वर्षभरापूर्वी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जत तालुक्यात 'नंदादीप योजना' प्रभावीपणे राबविण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि कथित अनियमिततेमुळे योजनेचा उद्देशच हरवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाळेखिंडी येथील विहीर योजनेचे लाभार्थी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी रोजगार हमी योजनेचा लाभ मिळविताना आलेल्या अडचणी, आर्थिक व्यवहारांबाबतचे आरोप आणि प्रशासनाकडून झालेल्या कथित त्रासाची माहिती माध्यमांसमोर मांडली. त्यामुळे पंचायत समितीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून तालुक्यात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महादेव हिंगमिरे यांनी सांगितले की, रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच पंचायत समितीतील संबंधित संगणक ऑपरेटरसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार लवकरच रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे करून सखोल चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी हिंगमिरे यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा पारदर्शक आणि विनाअडथळा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार असून, त्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


