खोजणवाडीत हाणामारी, पोलिस व कार्यकर्ते जखमी; इतर ठिकाणी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान
जत तालुक्यात मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. चुरशीच्या राजकीय लढतीमुळे तालुक्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा सहभाग लक्षणीय ठरला.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मतदान शांततेत पार पडले असले तरी खोजणवाडी गावात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. या घटनेत पोलिस कर्मचारी आणि काही राजकीय कार्यकर्ते जखमी झाले. तत्काळ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील मतदान सुरळीत केले.
महिलांचा पुढाकार, मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा;
जत तालुक्यातील जाडरबोबलाद, उमदी, संख, दरीबडची, मुचंडी, बिळूर, दफळापुर, शेगाव, बनाळी इत्यादी जिल्हा परिषद गटासह इतर गावांमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे गर्दी केली होती. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावल्याने अनेक केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रणेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही वेळ मतदान थांबवावे लागले; मात्र प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली.
खोजणवाडीत वाद, पोलिसांचा त्वरित हस्तक्षेप;
खोजणवाडी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये सायंकाळी वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी व काही कार्यकर्ते जखमी झाले. घटनेनंतर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली आणि पुढील मतदान शांततेत पूर्ण झाले.
राजकीय नेत्यांचे आवाहन; लोकशाही मजबूत करण्याचा निर्धार;
मतदानानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
“जनतेने मोठ्या विश्वासाने मतदान केले असून विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळेल,” असे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले. तर “ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची कसोटी आहे,” असेही मत माजी लोकप्रतिनिधींनी मांडले.
मतदान टक्केवारी समाधानकारक;
तालुक्यातील अनेक गावांमध्ये ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह पाहता लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
उद्या मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष;
संपूर्ण तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या गटाला कौल मिळतो, कोणत्या ठिकाणी राजकीय समीकरणे बदलतात, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

