yuva MAharashtra डोंगरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची कोजागिरी यात्रा उत्साहात | हजारो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन; महाप्रसादाचा लाभ

डोंगरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची कोजागिरी यात्रा उत्साहात | हजारो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन; महाप्रसादाचा लाभ

जत वार्ता न्यूज
By -


जत | प्रतिनिधी :
     जत येथील डोंगरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची कोजागिरी पौर्णिमा यात्रा सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने अंबाबाई मंदिर परिसर गजबजून गेला होता. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
     नवरात्रोत्सवानंतर बंद असलेले श्री अंबाबाई देवीचे मंदिर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहाटे दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे देवीच्या मूर्तीचा अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. त्यानंतर देवीसमोर भजनाचा कार्यक्रम झाला. देवीची आरती आणि जोगव्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी पुरोहित अनिल देशपांडे यांनी देवीच्या सहस्रनामावलीचे पठण केले.
     दुपारी बारा वाजता देवीची आरती करून महानैवेद्य दाखविण्यात आला. श्री अंबाबाई देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याचा मान येथील माने-पाटील घराण्याकडे आहे. त्यानुसार माने-पाटील घराण्याच्या वतीने वाजतगाजत डोंगरावर जाऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
     यात्रेनिमित्त श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मंदिरात विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंडळाचे सभासद अनिल देशपांडे, मुर्गेश काळगी, भूषण साळे आणि अथर्व देशपांडे यांनी सजावटीसाठी परिश्रम घेतले.
     यात्रेमुळे अंबाबाई मंदिर परिसरातील वनक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला उत्सवी आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.
     यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजीबापू भोसले, दीपक शिंदे, यशवंत शिंदे, अनिल शिंदे, बाळासाहेब हुंचाळकर, तानाजी यादव, पुंडलिक पांढरे, भारत गायकवाड, अजित शिंदे, अशोक माने-पाटील, अविनाश वाघमारे, अरविंद कोरे, शशिकांत काळगी, बसू चौगुले आदींनी परिश्रम घेतले.

Tags: