yuva MAharashtra पाच्छापूर विकास सोसायटीच्या ठरावावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; जत पोलीस ठाण्यासमोर तणाव

पाच्छापूर विकास सोसायटीच्या ठरावावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; जत पोलीस ठाण्यासमोर तणाव

जत वार्ता न्यूज
By -

'मला कोणीही उचलून नेले नाही,' संबंधित सदस्याचा पोलिसांसमोर खुलासा; कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक


जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्यातील पाच्छापूर सहकारी विकास सोसायटीच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सोमवारी जत पोलीस ठाण्यासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित सोसायटीच्या एका सदस्याबाबत अपहरणासदृश संशय व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांनी जत पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या घडामोडींना वेग आला.
     परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार आणि मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सदस्याला काही जणांनी उचलून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांनी जत पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित सदस्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची विचारपूस केली.
    पोलिसांसमोर संबंधित सदस्याने, "मला कोणीही उचलून नेलेले नाही. मी माझ्या स्वतःच्या इच्छेने फिरायला आलो होतो," असे स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
     दरम्यान, सायंकाळच्या सुमारास भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जत पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. संबंधित सदस्याला आपापल्या वाहनातून सोबत घेऊन जाण्याचा आग्रह दोन्ही बाजूंकडून करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या सदस्याने "मला कोणासोबतही जायचे नाही. मला माझ्या घरी जायचे आहे," अशी स्पष्ट भूमिका घेतली.
     यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.
     या घटनेमुळे पाच्छापूर सहकारी विकास सोसायटीच्या ठरावाभोवतीचे राजकारण अधिकच तापल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती किंवा गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी अद्याप झालेली नाही.