yuva MAharashtra 'देवभूमी जत' नामांतराला शिवसेनेचा ठाम विरोध; ९ ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा | जतच्या ऐतिहासिक ओळखीवर घाला घालू देणार नाही; सर्वपक्षीय परिषदेनंतर मोर्चाची घोषणा

'देवभूमी जत' नामांतराला शिवसेनेचा ठाम विरोध; ९ ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा | जतच्या ऐतिहासिक ओळखीवर घाला घालू देणार नाही; सर्वपक्षीय परिषदेनंतर मोर्चाची घोषणा

जत वार्ता न्यूज
By -
जत |प्रतिनिधी : 
      जत तालुक्याचे नाव बदलून 'देवभूमी जत' करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेने या नामांतराला तीव्र विरोध दर्शविला आहे. तालुक्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीशी छेडछाड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत ९ ऑगस्ट रोजी जतमध्ये सर्वपक्षीय जनआंदोलन व मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केली आहे.
     हिंगमिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जत हे नाव शेकडो वर्षांच्या इतिहासाशी, सांस्कृतिक वारशाशी आणि स्थानिक जनतेच्या अस्मितेशी जोडलेले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय हेतूने तालुक्याच्या नावात बदल करण्याचा प्रयत्न हा जनभावनांवर आघात करणारा आहे. अशा कोणत्याही निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
     त्यांनी सांगितले की, ७ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जतमध्ये मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, युवक आणि सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
     महादेव हिंगमिरे यांनी आरोप केला की, जतच्या नावाबाबत सुरू असलेली चर्चा कोणत्याही व्यापक लोकमताशिवाय पुढे नेली जात आहे. तालुक्याच्या नावाचा निर्णय हा काही मोजक्या व्यक्तींचा विषय नसून संपूर्ण जनतेच्या भावना आणि इतिहासाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जनतेचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.
     दरम्यान, या विषयावर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी सामाजिक माध्यमांवरून 'देवभूमी जत' या संकल्पनेला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा सुरू असली, तरी शिवसेनेने या भूमिकेला जोरदार विरोध नोंदविला आहे.
     हिंगमिरे यांनी पुढे सांगितले की, जतची ओळख, इतिहास आणि अस्मिता जपण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर एकत्र येऊन आंदोलन उभारले जाणार आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून संपूर्ण तालुक्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
जत नाव कायम ठेवण्याची मागणी ;
     शिवसेनेने तालुक्याचे नाव बदलण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला विरोध दर्शवत, 'जत' हे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे, अशी मागणी केली आहे. नामांतराचा प्रस्ताव मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महादेव हिंगमिरे यांनी दिला आहे.