yuva MAharashtra संख-अंकलगी तलावात पाणी न सोडल्यास शुक्रवारी कॅण्डल मार्च | तुकाराम बाबा महाराजांचा इशारा; बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

संख-अंकलगी तलावात पाणी न सोडल्यास शुक्रवारी कॅण्डल मार्च | तुकाराम बाबा महाराजांचा इशारा; बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मायथळ येथून गुड्डापूर, संख आणि अंकलगी तलावापर्यंत म्हैसाळचे पाणी पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या बंदिस्त पाइपलाइनचे काम संथ गतीने सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. हे काम तातडीने सुरू करून तलावांमध्ये पाणी सोडावे, अन्यथा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता अंकलगी येथे कॅण्डल मार्च काढण्यात येईल, असा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रमुख ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी दिला.
     आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जत पूर्व भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. टँकर गावात दाखल होताच पाणी भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने काम होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांपासून पाण्यासाठी लढा -
     तुकाराम बाबा महाराज म्हणाले, जत तालुक्याच्या पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलने आणि पाठपुरावा सुरू आहे. संख ते मुंबई मंत्रालय अशी ऐतिहासिक पायी दिंडी काढून पाण्याचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला. या आंदोलनादरम्यान जतला देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली. आंदोलन केले नसते, तर केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले असते.
     संख, अंकलगी, बालगाव, सोन्याळ आदी ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली. ‘रक्त घ्या, पाणी द्या’ अशी आर्त हाक देत रक्तदानही केले. विस्तारित म्हैसाळ योजना तसेच अंकलगी आणि गुड्डापूर तलावापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या लढ्याला यश येऊन काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत; मात्र त्यांचा वेग अत्यंत संथ असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी असूनही जत पूर्व भाग तहानलेला -
     कोयना धरणात पाणी उपलब्ध आहे आणि म्हैसाळ योजनेचे पाणीही सुरू आहे. मात्र, बंदिस्त पाइपलाइनचे काम संथ गतीने सुरू असल्याने जत पूर्व भागाला अपेक्षित पाणी मिळत नसल्याचा आरोप तुकाराम बाबा महाराज यांनी केला. मायथळ येथून गुड्डापूर तलावात आतापर्यंत पाणी पोहोचणे अपेक्षित होते; परंतु अद्याप पाणी आलेले नाही.
     बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने मार्गी लावून पुढील दहा दिवसांत गुड्डापूर तलावात पाणी पोहोचवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
श्रेयवाद नको, पूर्व भागाला पाणी द्या!
     दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत पाणी आणण्याचे श्रेय कोणी घ्यावे, यापेक्षा जत तालुक्याच्या पूर्व भागाला प्रत्यक्ष पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे श्रेयवाद बाजूला ठेवून शासन आणि प्रशासनाने पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करावे आणि तलावांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी केली.
     शुक्रवारी अंकलगी येथे सायंकाळी ७ वाजता कॅण्डल मार्च काढण्याच्या इशाऱ्यामुळे म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता शासन व प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे जत पूर्व भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.