जतवार्ता न्यूज नेटवर्क;
शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, CTET परीक्षेस प्रविष्ट असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्यात यावी, अशी ठोस मागणी जत तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिक्षक भारतीकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार CTET परीक्षा शिक्षकांसाठी पात्रता मिळविण्यासाठी बंधनकारक आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक या परीक्षेला बसणार असून, निवडणूक व परीक्षा एकाच दिवशी आल्यास शिक्षकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
CTET परीक्षेस बसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून सवलत देण्यात यावी, अथवा सदर दिवशी मतदानाची तारीख निश्चित करू नये, जेणेकरून शिक्षक परीक्षेला उपस्थित राहू शकतील, अशी प्रमुख मागणी शिक्षक भारतीने केली आहे. तसेच दिव्यांग शिक्षक, ५५ वर्षांवरील शिक्षक, स्तनदा माता, गंभीर आजार असलेले शिक्षक तसेच BLO (बुथ लेव्हल ऑफिसर) यांना निवडणूक कामाचे आदेश देण्यात येऊ नयेत, अशीही स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणाऱ्या अहवालात या सर्व बाबींचा सकारात्मक आणि संवेदनशीलतेने विचार करण्यात यावा, अशी नम्र विनंती शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, रमेश कोळी, जितेंद्र बोराडे, अविनाश सुतार, रावसाहेब चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे.

