जत | प्रतिनिधी:
जत येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कामकाजावर बहुजन समाज पक्षाने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वृक्षलागवड, वनमहोत्सव खर्च, कार्यालयीन कामकाज आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील क्यातन यांनी विभागीय वनाधिकारी (DFO), सांगली यांच्याकडे तक्रार केली आहे. संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील रेवनाळ येथील वृक्षलागवड कामात शासनाच्या निकषांनुसार खड्डे खोदण्यात आले नसून आवश्यक प्रमाणात जैविक खतांचाही वापर झालेला नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची गुणवत्ता संशयास्पद आहे. तसेच गोमाता वळू केंद्र (मेवाकी), जत येथील वृक्षलागवडीतही खड्ड्यांमधील अंतर, कंपोस्ट व इतर सेंद्रिय खतांचा वापर यासह तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही.
याशिवाय वनमहोत्सव सप्ताहात विविध शाळांमध्ये फरसाण, शेव पॅकेट, चहा-नाश्ता, डिजिटल बोर्ड, बॅनर्स व प्रमाणपत्र वितरणासाठी खर्च दाखविण्यात आला. मात्र, काही शाळांमध्ये प्रत्यक्षात असे कार्यक्रमच झाले नाहीत. त्यामुळे संबंधित खर्चाची बिले, व्हाउचर्स, जीओ-टॅगिंग, छायाचित्रे, उपस्थिती नोंदी व इतर कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातील एका वनक्षेत्रपालाच्या नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी स्थानिक रहिवासी असून त्यांची नियुक्ती कोणत्या निकषांवर झाली, तसेच ते कार्यालयात नियमित उपस्थित असतात का, याची सीसीटीव्ही फुटेज, उपस्थिती नोंदवही व हालचाल नोंदवही तपासून खातरजमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका परिसरातील कमानीच्या रंगकामाची झालेली दुरवस्था आणि त्यातून महापुरुषांचा अवमान होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून, संबंधित प्रकरणात कायदेशीर तरतुदी लागू होतात का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बसपाने विभागीय वनाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चौकशी समिती नेमणे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे, सर्व आर्थिक व तांत्रिक कागदपत्रांची पडताळणी करणे, दोषींवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करणे आणि चौकशी अहवाल लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुनील क्यातन यांनी निवेदनातून दिला आहे.

