yuva MAharashtra जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना सहा महिन्यांचे मानधन दुष्काळ सहायता निधीत जमा करा | पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बगली यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना सहा महिन्यांचे मानधन दुष्काळ सहायता निधीत जमा करा | पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बगली यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार  बगली यांनी आपल्याला प्राप्त होणारे सहा महिन्यांचे मासिक मानधन मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत जमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
     जत तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पंचायत समितीचा उपसभापती म्हणून मिळणारे सहा महिन्यांचे मानधन दुष्काळ निवारणासाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे बगली यांनी पत्रात नमूद केले आहे.
     हे मानधन संबंधित अधिकृत दुष्काळ सहायता निधी अथवा खात्यामध्ये वर्ग करून स्वीकारण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. दुष्काळाच्या कठीण काळात आपण करीत असलेले हे छोटेसे योगदान गरजू नागरिकांसाठी उपयोगी पडावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
     या मागणीची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती जत यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.