yuva MAharashtra जत येथे महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापन दिन उत्साहात | आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी व शहीद परिवारांचा मोठा सहभाग; शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेच्या परंपरेला उजाळा

जत येथे महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापन दिन उत्साहात | आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी व शहीद परिवारांचा मोठा सहभाग; शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेच्या परंपरेला उजाळा

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ;
     महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापन दिन जत येथे उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे यासह विविध जिल्ह्यांतून महार रेजिमेंटचे आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता, शहीद परिवार तसेच १९६५ व १९७१ च्या युद्धातील बॅटल कॅज्युएल्टी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे २५० किलोमीटर अंतरावरूनही अनेक सैनिक परिवार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
      कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर महार रेजिमेंटचा ध्वजारोहण करण्यात आले. रेजिमेंट गीत सादर करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सैनिक व परिवारांनी भव्य रॅली काढून शोभा मंगल कार्यालय गाठले.
     शोभा मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महार रेजिमेंटचा ध्वज फडकविण्यात आला. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर थोर महापुरुष तसेच देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन आकाश कांबळे होते. कार्याध्यक्ष कॅप्टन गंगाप्पा खंडाळे, सचिव कॅप्टन विजय कुरणे, सहसचिव प्रकाश काळे, खजिनदार दत्तात्रय शिंदे, कार्यवाहक हवालदार बाबासाहेब कांबळे आणि हवालदार नानाजी संकपाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन मंगेश मोहिते, कॅप्टन शशिकांत चव्हाण, सुभेदार लग्माना कांबळे, सुभेदार किशन चव्हाण, सुभेदार सोमाजी खरोटमल, हवालदार महादेव वाघमारे आणि हवालदार वसंत डावरे उपस्थित होते.
     यावेळी महार रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरेवर, सैनिकांच्या शौर्य व त्यागावर तसेच शहीद परिवारांच्या योगदानावर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सुभेदार लग्माना कांबळे, वीर पत्नी सुनीता मोरे यांच्यासह आजी-माजी सैनिकांनी विचार मांडले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाची आठवण हा कार्यक्रमातील भावनिक क्षण ठरला.
     महार रेजिमेंटचा शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या आयोजन समितीचे आणि सहकार्य करणाऱ्या सैनिक परिवारांचे आभार हवालदार (निवृत्त) संजय माने यांनी मानले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र माने सर व हवालदार संजय माने यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर महार गण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपस्थित सैनिक व परिवारांनी समूह छायाचित्र घेतले. दूरवरून आलेल्या सैनिक परिवारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
     जत येथे झालेला महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापन दिन शौर्य, त्याग, राष्ट्रसेवा आणि सैनिक बंधुभावाचा जागर करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.