जत | प्रतिनिधी :
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जत तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बिळूर येथे गुरुवारी (दि. ८) सेवा सेतू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु बसवेश्वर मठ, बिळूर येथे सकाळी १० वाजता शिबिरास सुरुवात होणार आहे. उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे आणि तहसीलदार प्रविण धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी महसूल विभागाच्या २२ हून अधिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये जिवंत सातबारा मोहीम व पिकांची नोंद, गावठाण नकाशा दुरुस्ती, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज, पाणंद रस्ते, शिधापत्रिका वाटप, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, स्मशानभूमीसाठी जमीन, विद्युत जोडणीवरील नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे आदी सेवांचा समावेश आहे.
तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत विहिरीसाठी जागेची ऑनलाइन नोंदणी, दिव्यांग, विवाह नोंदणी, आधार कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ दारू परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक, महिला व किशोरी वयाचा दाखला, ७/१२ व ८-अ उतारा अद्ययावत करणे तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहार नोंदणी आदी सेवाही शिबिरात उपलब्ध असतील.
बिळूर व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून उपलब्ध सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, जत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

