जत | प्रतिनिधी :
स्वराज्यरक्षक शिवरत्न शिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई शाखा, सांगली जिल्हा व जत तालुका शाखेच्या वतीने जत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती सोहळ्यानिमित्त समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जयंती सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता ज्योत आगमन व मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता शिवरत्न शिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विविध शासकीय व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच नाभिक समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जत तालुकाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख राम बनकर, जिल्हा सदस्य विश्वनाथ म्हेत्रे व सुभाष क्षीरसागर यांनी समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.


