yuva MAharashtra जत नगरीत नरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी | रामपूरच्या ज्योतीचे स्वागत; भव्य रथयात्रा, मर्दानी लेझीम आणि शिवकालीन वेशभूषांनी वेधले लक्ष

जत नगरीत नरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी | रामपूरच्या ज्योतीचे स्वागत; भव्य रथयात्रा, मर्दानी लेझीम आणि शिवकालीन वेशभूषांनी वेधले लक्ष

जत वार्ता न्यूज
By -

 

जत | प्रतिनिधी : 

     नरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त जत नगरीत शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामपूरहून आणलेल्या ज्योतीचे स्वागत, भव्य रथयात्रा, मर्दानी लेझीम पथकाचे सादरीकरण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिवकालीन शूरवीरांच्या वेशभूषांमुळे जयंती सोहळ्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली.

     रामपूरहून आणलेल्या ज्योतीचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आगमन झाल्यानंतर उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी मामा झुंजार आणि ॲड. प्रभाकर भाऊ जाधव यांच्यासह मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून संत सेना मंदिरापर्यंत भव्य रथयात्रा काढण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून ज्योतीचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्ये आणि तुतारीच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला.


मर्दानी लेझीम आणि शिवकालीन वेशभूषा ठरल्या आकर्षण -

     कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील केळेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी लेझीम पथकाने सादर केलेल्या मर्दानी लेझीमने उपस्थितांची मने जिंकली. विश्वास गंगाधर यांनी बाजीप्रभू देशपांडे, तर संग्राम मोठे यांनी शिवरत्न शिवाजी काशीद यांची वेशभूषा साकारली. यमनप्पा जाधव यांच्या प्रभावी तुतारीवादनाने मिरवणुकीची शोभा वाढवली. कोल्हापूर आणि सांगली परिसरातील कलाकारांच्या सादरीकरणामुळे सोहळ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासाठी सहकार्याचे आश्वासन -

     कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून नरवीर शिवरत्न जिवाजी महाले आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जत तालुका युवक अध्यक्ष विष्णू देवकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

     यावेळी ॲड. प्रभाकर भाऊ जाधव यांनी नाभिक समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, तसेच वीर शिवा काशीद यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली. नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी मामा झुंजार यांनी समाजातील व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून समाजाच्या रास्त मागण्यांसाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.


विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती -

     या सोहळ्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कोषाध्यक्ष रामदास दादा पवार, सांगली जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीधर वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख राम बनकर, पुणे विभागीय युवक अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर, युवक कोषाध्यक्ष विशाल गायकवाड, जत तालुकाध्यक्ष महेश जाधव आणि जत तालुका युवक अध्यक्ष विष्णू देवकर उपस्थित होते.

     तसेच नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय रावजी कांबळे, युवा नेते संग्राम भैया जगताप, ॲड. सतीश लोखंडे, विकास माने, योगेश बामणे, व्याख्याते गौरव जाधव, बाबासाहेब कदम, परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे, डफळापूरचे सरपंच सुभाषराव गायकवाड, पोपटराव शिंदे, बसवेश्वर गंगाधरे, चिणू जमदाडे आणि पैलवान अरुणदादा कोडग यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जत, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही सोहळ्याला उपस्थिती लावली.


आयोजकांच्या परिश्रमातून सोहळा यशस्वी -

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन माने पाटील यांनी केले, तर जत तालुकाध्यक्ष महेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनेश बनकर, दत्ता गायकवाड, सुभाष काळे, श्रीकांत गायकवाड, राम जाधव, धनंजय क्षीरसागर, तानाजी क्षीरसागर, नितीन गवळी, विकी होणे, सिद्धू कोरे, विकी देवकर, सतीश काळे, रामानंद जाधव, महेश देवकर, महादेव जाधव, पांडुरंग जाधव, राम बनकर, विष्णू देवकर आणि चिणू जमदाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भोजन व नाश्त्याच्या व्यवस्थेसाठी महादेव जाधव, नितीन गवळी, पांडुरंग जाधव आणि पंडित जाधव यांनी सहकार्य केले.

     नरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांच्या शौर्याचा वारसा जपणे, वीर शिवा काशीद यांच्या त्यागाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि समाजात एकजूट निर्माण करणे, हा संदेश या जयंती सोहळ्यातून देण्यात आला. ऐतिहासिक वारसा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.