yuva MAharashtra शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करा! विक्रम ढोणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा जतच्या प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषणाचा इशारा

शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करा! विक्रम ढोणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा जतच्या प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषणाचा इशारा

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या जनावरांसाठी तातडीने चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास जत येथील प्रशासकीय भवनासमोर शेतकरी व पशुपालकांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
     जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये चारा आणि पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने पशुपालकांसमोर जनावरांचे पालनपोषण करण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळत नसून पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकरी आणि पशुपालकांना पडला आहे.
     शेतीसोबत पशुपालन हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. दुधाळ जनावरे, शेळ्या आणि मेंढ्या हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र, चारा-पाणी टंचाईमुळे जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढत असून, आर्थिक अडचणीत असलेल्या पशुपालकांना चारा विकत घेणेही कठीण झाले आहे. याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असे ढोणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
चारा छावण्या सुरू करण्याची मागणी -
     शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या जनावरांसाठी शासनाच्या नियमानुसार चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा पर्यायी व्यवस्था करून चारा उपलब्ध करून द्यावा. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकर सुरू करावेत. चारा-पाणी टंचाईने अडचणीत आलेल्या शेतकरी व पशुपालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
     याशिवाय पशुधनासाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा. संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा -
     जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न केवळ पशुपालकांपुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष उपाययोजना करून शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा द्यावा, असे ढोणे यांनी म्हटले आहे.
     चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था न झाल्यास शेतकरी व पशुपालकांच्या न्याय्य हक्कांसाठी जतच्या प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही विक्रम ढोणे यांनी दिला आहे.