जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जतची सुकन्या कु. (ह. भ. प.) राजनंदिनी पवार हिला झी टी. व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या लोकप्रिय धार्मिक कार्यक्रमात कीर्तन सादर करण्याचा बहुमान मिळाला असून, ती पश्चिम महाराष्ट्रातील या कार्यक्रमात कीर्तन करणारी पहिलीच बालकीर्तनकार ठरणार आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे जत शहरासह परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जत येथील श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, जत यांच्या वतीने श्री. स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी झी टी. व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात येते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत व सुप्रसिद्ध कीर्तनकार सहभागी होत असून, त्यांचे कीर्तन व कथाकथनाचे सादरीकरण चित्रीत करून नंतर झी टॉकीज वाहिनीवर प्रसारित केले जाते.
आतापर्यंत या कार्यक्रमात ह. भ. प. श्री. सागर महाराज बोराटे, ह. भ. प. श्री. केशव महाराज उखळीकर, ह. भ. प. कै. गिरी महाराज, ह. भ. प. श्री. प्रशांत ठाकरे महाराज, ह. भ. प. संगीताताई येनपुरे (चोपडे), ह. भ. प. गीतांजलीताई झेंडे, ह. भ. प. दुर्गाताई पगार, ह. भ. प. मोहन (काका) पाटील, ह. भ. प. श्री. निलेश महाराज रायकर आदी नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनसेवा व कथा सादर केली आहे.
या मानाच्या यादीत आता जतची कन्या ह. भ. प. राजनंदिनी बापूसाहेब पवार हिचा समावेश झाला आहे. श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, जतचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब पवार यांची कन्या असलेल्या राजनंदिनी पवार या सध्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथे शिक्षण घेत असून अल्पवयातच तिने आपल्या मधुर व प्रभावी कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायात ओळख निर्माण केली आहे.
श्री. स्वामी समर्थ मंदिर, जत येथे वर्धापन दिनानिमित्त तिच्या कीर्तनाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. या कीर्तनाचे प्रसारण दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झी टी. व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमातून होणार आहे.
या ऐतिहासिक प्रसारणाच्या पार्श्वभूमीवर ह. भ. प. राजनंदिनी पवार हिच्या कीर्तन कार्यक्रमाचे डिजिटल फ्लेक्स जत शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून, नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जतच्या सुकन्येने पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच बालकीर्तनकार म्हणून मिळवलेला हा मान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

