yuva MAharashtra मुद्रांकाचा खेळ : जत मध्ये शंभर हरवला, पाचशे लादला!

मुद्रांकाचा खेळ : जत मध्ये शंभर हरवला, पाचशे लादला!

जत वार्ता न्यूज
By -

नागरिकांची आर्थिक कोंडी, प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून १०० रुपयांच्या मुद्रांक कागदाचा तीव्र तुटवडा जाणवत असून, याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. दैनंदिन शासकीय व कायदेशीर कामांसाठी आवश्यक असलेले १०० रुपयांचे मुद्रांक उपलब्ध नसल्याने नागरिकांना गरज नसतानाही ५०० रुपयांचे मुद्रांक खरेदी करण्याची वेळ येत आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    घरभाडे करार, प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, हमीपत्र, बँक व न्यायालयीन कामे यासाठी मोठ्या प्रमाणावर १०० रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता असते. मात्र सध्या जत येथील परवाना धारक विक्रेत्यांकडे हे मुद्रांक उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. “१०० चा मुद्रांक नाही, ५०० चाच घ्यावा लागेल,” असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे.
     विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, मजूर, ज्येष्ठ नागरिक व सामान्य मध्यमवर्गीय यांना या तुटवड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवघ्या १०० रुपयांच्या कामासाठी ५०० रुपयांचा मुद्रांक घेणे म्हणजे उर्वरित रक्कम वाया जाणे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक प्रकरणांत काम तातडीचे असल्याने पर्याय नसल्याने नागरिक नाइलाजाने महागडा मुद्रांक घेत असल्याचे वास्तव आहे.
     या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व मुद्रांक विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. जतसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मूलभूत मुद्रांक उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागणी असूनही पुरवठा न होणे, वितरणातील अनियमितता व नियोजनाचा अभाव याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
     “तुटवड्याचा फायदा घेऊन नागरिकांची अडवणूक होत आहे का?” असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने १०० रुपयांच्या मुद्रांकाचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.