yuva MAharashtra माघार घेतलेल्यांना न्याय की समीकरणांचा बळी? जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून घमासान

माघार घेतलेल्यांना न्याय की समीकरणांचा बळी? जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून घमासान

जत वार्ता न्यूज
By -

भाजप–काँग्रेसला प्रत्येकी एकच संधी; पक्ष नेतृत्वापुढे कठीण कसोटी

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीचे अधिकार मर्यादित असल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसला प्रत्येकी एकच स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
     जत नगरपरिषदेत झालेल्या निवडणुकीत भाजपचे ११ नगरसेवक व एक अपक्ष असे एकूण १२ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचे ८ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. सात नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा नियम असल्याने या नगरपरिषदेत एकूण दोनच स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यानुसार सत्ताधारी भाजपला एक व विरोधी काँग्रेस गटाला एक अशीच संधी मिळणार आहे.
     जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे डॉ. रविंद्र आरळी हे थेट निवडून आले आहेत. नुकतीच नगराध्यक्ष डॉ. आरळी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची बैठक पार पडली असून, त्यात प्रभाग २ चे नगरसेवक प्रमोद हिरवे यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
     आता भाजपसमोर उपनगराध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवक तसेच विषय समित्यांचे सभापतीपद वाटप करताना मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. भाजपकडे ११ निवडून आलेले व एक अपक्ष असा एकूण १२ नगरसेवकांचा गट होणार असल्याने, प्रत्येक पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. परिणामी पक्षांतर्गत लॉबिंग जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.
    विशेष म्हणजे, नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजपच्या हितासाठी माघार घेतलेल्या नेत्यांनाही आता संधी देण्याचा प्रश्न नेतृत्वासमोर आहे. प्रभाग ८ मधून भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल मोरे यांनी पक्षासाठी उमेदवारी मागे घेतली होती. तसेच नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनीही माघार घेतल्याने, या दोघांची योग्य प्रकारे दखल कशी घ्यायची, हा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्यापुढे आहे.
     दरम्यान, भाजपकडे एकाच स्वीकृत नगरसेवकाची संधी असल्याने या पदासाठी अनेक इच्छुक पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, प्रवीण वाघमोडे, दीपक उर्फ संतोष मोटे, अतुल मोरे, परशुराम मोरे आदींच्या समर्थकांकडून जोरदार मागणी होत आहे.
    एकीकडे काँग्रेसलाही आपला एकमेव स्वीकृत नगरसेवक निवडताना तितकीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणाऱ्या या निवडींमधून नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार असून, पक्ष नेतृत्व नेमकी कोणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.