मिरज :
मिरज शहर व परिसरात प्राणघातक हत्यारे बाळगून दहशत माजवणाऱ्या व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार सोहेल उर्फ शाबाज बादशाह सुभेदार (वय २४, रा. ख्रिश्चन दफनभूमी जवळ, इदगाह नगर झोपडपट्टी, मिरज) याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाकडून ही कठोर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
शाबाज सुभेदार याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हत्यारे वापरून दहशत माजवणे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण करणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. वारंवार गुन्हे दाखल होऊनही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. जामिनावर सुटल्यावरही तो पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करत असल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये शाबाज सुभेदार याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय दंडाधिकारी, मिरज विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला. सुनावणीनंतर सदर प्रस्ताव मंजूर करून शाबाज सुभेदार याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
त्या आदेशानुसार २९ डिसेंबर २०२५ रोजी त्याला ताब्यात घेऊन सांगली जिल्ह्याबाहेर कर्नाटक राज्यातील कागवाड येथे सोडण्यात आले. या कारवाईमुळे मिरज शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला दिलासा मिळणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगामी काळातही सराईत, धोकादायक व समाजविघातक गुन्हेगारांविरोधात एमपीडीए, हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाई यासारख्या कठोर उपाययोजना राबवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार सांगली पोलीस प्रशासनाने केला आहे.

