yuva MAharashtra जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीवर राजकीय संघर्ष; नियमांच्या आधारे व पक्षाकडूनच माझी निवड जाहीर विरोधकांनी श्रेय घेऊ नये; महादेव कोळी

जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीवर राजकीय संघर्ष; नियमांच्या आधारे व पक्षाकडूनच माझी निवड जाहीर विरोधकांनी श्रेय घेऊ नये; महादेव कोळी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत नगरपरिषदेच्या पहिल्या विशेष निवड सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय अजेंड्यावर असताना भाजपच्या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीस काँग्रेसकडून स्थगिती मिळावी, यासाठी पत्र देत आक्षेप नोंदविण्यात आला होता. नगरपरिषद नियमांनुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड ही याच सभेत होणे अपेक्षित असताना काँग्रेसकडून निर्माण करण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे सभागृहात राजकीय वातावरण तापले.
      या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नगरसेवकांकडून नियमांचा ठाम आधार घेत पहिल्या क्रमांकाच्या अर्जदाराचा अर्ज वैध धरावा व महादेव कोळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून तात्काळ निवड जाहीर करावी, अशी आक्रमक भूमिका घेतली.
      या भूमिकेनंतर नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी व मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद नियमांचा आधार घेत महादेव कोळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत निवड जाहीर केली. काँग्रेसकडून कोळी यांच्यावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप गौतम ऐवाळे व मिथुन भिसे यांनी केला होता.
     दरम्यान, या संपूर्ण वादावर बोलताना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेले महादेव कोळी यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावत वस्तुस्थिती स्पष्ट केली. काँग्रेसकडून अनेक इच्छुक होते व त्यामध्ये आपणही एक असल्याचे सांगत, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वांना अर्ज भरण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी नमूद केले. काही तांत्रिक अडचणींमुळे काही इच्छुक अर्ज भरू शकले नाहीत; मात्र मी स्वतःचा व सुजितसिंह शिंदे यांचा अर्ज वैधरीत्या दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेसचे गटनेते संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
     निवड सभेमध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप करत कोळी म्हणाले की, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, सभापती सुजय नाना शिंदे, गटनेते भूपेंद्र कांबळे तसेच काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी मला स्वीकृत नगरसेवक पदी निवडीसाठी पाठिंबा दिला आहे. असे असताना विरोधकांनी या निवडीचे श्रेय घेऊ नये व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये.
शेवटी बोलताना महादेव कोळी यांनी ठाम शब्दांत सांगितले की, काँग्रेस पक्षाने मला स्वीकृत नगरसेवक पदी निवडून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. या संधीचे मी सोने करीन, नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करीन आणि काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.