जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात कार्यरत असलेल्या रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका कु. मेहजबीन रफिक मुजावर यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षण व औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळाली आहे.
“तेल-पाणी वेगळे करण्यासाठी मेणबत्तीच्या काजळीवर आधारित सच्छिद्र सुपरहायड्रोफोबिक पृष्ठभागांच्या निर्मितीवरील अभ्यास” (Fabrication of porous superhydrophobic surfaces based on candle soot for oil–water separation) या नावाच्या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध सादर केला. तेल व पाणी वेगळे करण्याच्या प्रक्रियेत कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत मोलाचे मानले जात आहे.
हे संशोधन कार्य राजे रामराव महाविद्यालय, जत येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. शिवाजी कुलाल, प्रा. डॉ. अंकुश सरगर आणि प्रा. डॉ. दीपक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. तसेच शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. के. डी. सोनवणे, प्रा. डॉ. गरडकर, प्रा. डॉ. संकपाल व प्रा. डॉ. कोळेकर यांचेही त्यांना मौल्यवान मार्गदर्शन लाभले.
डॉ. मेहजबीन रफिक मुजावर यांनी आपल्या संशोधन विषयाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये पाच शोधनिबंध प्रकाशित करून संशोधन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, सहकारी, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून तरुण संशोधकांसाठी हे प्रेरणादायी ठरत आहे.

