yuva MAharashtra येळदरी येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदाच्या कामाची आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहणी

येळदरी येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदाच्या कामाची आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहणी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत तालुक्यातील येळदरी येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वितरण हौदाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या पाहणीदरम्यान कामाची सद्यस्थिती, झालेली प्रगती तसेच वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
     जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही उपसा सिंचन योजना अत्यंत महत्त्वाची असून, योजनेतील प्रत्येक टप्पा दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्टपणे सांगितले. कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
     वितरण हौदाच्या कामामुळे येळदरी व परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित व मुबलक पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी नमूद केले.
     या पाहणीवेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता श्री. रोहित कोरे, उपविभागीय अभियंता डवरी, कनिष्ठ अभियंता कोळी, शाखा अभियंता धनवडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती देत ठरलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
     शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यानंतर जत तालुक्याच्या कृषी विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.