जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या कु. पलक रियाज मुजावर हिचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. कु. पलक हिचा शालेय शैक्षणिक प्रोजेक्ट यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला असून तो प्रोजेक्ट त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी काकडे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नवोन्मेषी विचारांना चालना देणारे असे शैक्षणिक प्रोजेक्ट सांगली जिल्ह्याची ओळख अधिक उजळवतात, असे सांगितले. कु. पलक हिने सादर केलेला प्रकल्प हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच समाजोपयोगी दृष्टीकोन दर्शविणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रकल्प भविष्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पलकच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कु. पलकच्या यशामागे तिच्या शाळेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत, मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उरूण ईश्वरपूर येथील कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय (आदर्श स्कूल) यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच पलकचे पालक रियाज दादासाहेब मुजावर व सौ. आफ्रीन रियाज मुजावर यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही जिल्हाधिकारी काकडे यांनी कौतुक केले.
हा सत्कार सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरून, शैक्षणिक क्षेत्रात नवे प्रयोग करण्यास निश्चितच प्रोत्साहन देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

