“कारखान्याची काजळी म्हणजे मृत्यूचा पाऊस!”
जत तालुक्यातील राजाबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या धुराड्यातून मोठ्या प्रमाणात काजळी व राख (Fly Ash) उडत असून, त्यामुळे परिसरातील शेती, पिके व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार, जत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार वाघमोडे व जत परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२४–२५ चा गाळप हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याच्या धुराड्यातून सातत्याने काजळी व राख हवेत मिसळत आहे. ही काजळी आसपासच्या शेतजमिनींवर साचत असून द्राक्षे, डाळिंब, मका, पालेभाज्या तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काजळी साचल्यामुळे द्राक्षे व डाळिंबाची गुणवत्ता खालावली असून, व्यापारी माल खरेदीस नकार देत आहेत. पालेभाज्यांवर काजळीचा थर बसल्याने त्या बाजारात विक्रीयोग्य राहत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून, संपूर्ण परिसरातील शेती संकटात सापडली आहे.
याशिवाय रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात काजळी हवेत सोडली जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात काजळी जाणे, अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. घरांमध्ये, पिण्याच्या पाण्यावर व अन्नावर काजळी साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार व त्वचारोग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी अनेकदा कारखाना व्यवस्थापनाला सूचना देऊनही केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. ४–५ दिवस परिस्थिती सुधारल्यासारखी दिसते, मात्र नंतर पुन्हा तशीच गंभीर अवस्था निर्माण होते. कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
भाजप व किसान मोर्चाने प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारखान्याला तात्काळ नोटीस बजावण्यात यावी. कारखान्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी Wet Scrubber, ESP आदी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच बाधित शेतकऱ्यांना व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.
तात्काळ कारवाई नाही तर आंदोलन;जर प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे आता संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.


