जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरातील शासकीय ओढापात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे सुरू असून या बेकायदेशीर बांधकामांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय ओढापात्रात काही व्यक्तींनी थेट पत्राशेड उभारून अतिक्रमण केले असून नैसर्गिक नाल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
शासकीय मालमत्तेवर सर्रासपणे अतिक्रमणे होत असताना स्थानिक प्रशासन मात्र गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेवर ही अतिक्रमणे सुरू आहेत तो परिसर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येतो. या प्रभागात यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याची उदाहरणे असून त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
ही सर्व अतिक्रमणे थेट शासकीय ओढापात्रात होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात या परिसरातील रहिवाशांना पाणी तुंबणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशाराही जाणकार नागरिकांनी दिला आहे.
या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे जत शहराची अवस्था बकाल होत चालली असून अतिक्रमणधारकांना स्थानिक प्रशासनासह संबंधित प्रभागातील नगरसेवकांचा पाठिंबा असल्यानेच ही धडाकेबाज अतिक्रमणे सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळेच प्रशासन व लोकप्रतिनिधी या वाढत्या अतिक्रमणांविरोधात कारवाई न करता अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत असल्याचा रोष व्यक्त होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या अतिक्रमणांमधून जत नगरपरिषदेला एक फुटकी कवडीही उत्पन्न मिळत नाही. उलट, भविष्यात हीच अतिक्रमणे नगरपरिषद व प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. विनापरवाना सुरू असलेली ही सर्व अतिक्रमणे त्वरित हटवावीत, शासकीय ओढापात्र मोकळे करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम अपेक्षा जत शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष करून शहराला अतिक्रमणांच्या गर्तेत ढकलणार, याकडे संपूर्ण जत शहराचे लक्ष लागले आहे.

